| 1 |
केंद्र शासनाचे ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार, पद्म पुरस्कार. |
ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार - हा खेळातील सर्वोच्च जीवन पुरस्कार आहे. खेळात असामान्य कर्तृत्व दाखविणाऱ्या आणि निवृत्तीनंतरही खेळासाठी जीवन व्यतीत करणाऱ्या खेळाडूला ध्यानचंद जीवन गौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, ब्लेझर व रोख रक्कम रु.५.०० लाख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार - देशासाठी अतिशय उल्लेखनीय व प्रेक्षणीय अशी क्रीडा कामगिरी ज्या खेळाडूंनी मागील ४ वर्षांमध्ये केलेली आहे अशा खेळाडूंचा गौरव सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने केला जातो. पदक, प्रमाणपत्र व रोख रक्कम रु.७.५० लाख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.. अर्जुन पुरस्कार - आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूला या पुरस्काराने सन्मानित केले जाते. स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, ब्लेझर व रोख रक्कम रु.५.०० लाख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. द्रोणाचार्य पुरस्कार - आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या खेळाडूंनी उल्लेखनीय व प्राविण्य मिळविलेली कामगिरी केलेली आहे व देशाला अभिमानास्पद अशी कामगिरी केलेली आहे अशा खेळाडूंना प्रशिक्षण देण्या-या प्रशिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी सन्मानित केले जाते. स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, ब्लेझर व रोख रक्कम रु. ५.०० लाख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार - देशामध्ये खेळाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन विविध संस्था, असोसिएशन, फेडरेशन व स्पोर्टस् कंट्रोल बोर्डमध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे अशांना प्रोत्साहन देण्यासाठी स्मृतीचिन्ह देऊन या पुरस्काराने सन्मानित केले जाते. पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार - पद्म पुरस्कार हे सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असून ते अतिशय प्रतिष्ठेचे असतात. हे पुरस्कार विविध क्षेत्रांमधील उल्लेखनीय सेवेबद्दल दिले जातात. या पुरस्कारासाठी संबंधित क्षेत्रातील अत्त्युत्कृष्ट कार्य हा निकष असून या उल्लेखनीय कार्यामध्ये समाजसेवा हाही एक घटक असणे आवश्यक आहे. |
| 2 |
खेलो इंडीया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन. |
केंद्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत सन 2017-18 या वर्षापासून खेलो इंडीया या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजने अंतर्गत खालील क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. 1. आर्चरी 2. बॉक्सिग 3. ज्युदो 4. जिम्नॅस्टीक्स 5. जलतरण 6. मैदानी 7. वेटलिफ्टींग 8. बॅडमिंटन 9. कुस्ती 10. रायफल शुटींग 11. कबड्डी 12. खो-खो 13. व्हॉलीबॉल 14. बास्केटबॉल 15. हॉकी 16. फुटबॉल 17.टेबलटेनिस 18.टेनिस या खेळांच्या राष्ट्रीय स्पर्धेमधून 1000 खेळाडूंची निवड करण्यात येणार असून, अशा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांच्या तयारीसाठी प्रतिवर्ष रु.5.00 लक्ष याप्रमाणे पुढील आठ वर्षे आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन दिले जाणार आहे. |
| 3 |
खेलो इंडीया- क्रीडा सुविधा निर्मिती/नूतनीकरण व वापर |
केंद्र शासनाची क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी यापूर्वी अस्तित्वात असलेली 'अर्बन स्पोर्ट्स इन्फ़्रास्ट्रक्चर स्कीम' ही योजना आता 'खेलो इंडीया - क्रीडा सुविधा निर्मिती / नूतनीकरण व वापर' मध्ये रुपांतरीत करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत केंद्र शासनामार्फत क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी 100 टक्के ( शासन अनुदान मर्यादेत ) आर्थिक सहाय्य देण्यात येते. अनुदानास पात्र संस्था - 1. क्रीडा प्राधिकरण / राज्य क्रीडा परिषद 2. स्थानिक स्वराज्य संस्था 3. केंद्र / राज्य शासनांतर्गत शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे. 4. स्पोर्टस कंट्रोल बोर्डस 5. भारतीय क्रीडा प्राधिकरण 6. याशिवाय डिपार्टमेंटल प्रोजेक्ट ॲप्रूव्हल कमिटीने निश्चित केलेली अन्य संस्था. जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्फत प्राप्त प्रस्ताव शिफारशीसह शासनास सादर केले जातात. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग़, महाराष्ट्र शासन यांच्या शिफारशीने केंद्रीय क्रीडा मंत्रालयास सादर केले जातात. |